लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यस्त राहणारा माणूस अचानक रिकामा झाला की तो हळूहळू तणावाच्या गर्तेत ढकलला जातो. मात्र, तणावातही जगण्याचे प्रेरणा देते ती कला आणि ती कला जो लीलया आत्मसात करतो तो कलाकार. कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि अनेक जण निराशेच्या सावटात शिरले गेले. मात्र, काही अवलियांनी या टाळेबंदीचे सोने करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे. नागपुरातील पंकज कावळे या हरहुन्नरी कलाकाराने टाळेबंदीच्या या औदासीन्यात आपल्यातील कलावंताला अधिकच बहर दिला आणि ध्यानीमनी नसताना सहजच ‘ऑनलाईन’ बाजारपेठ त्याचे स्वागत करण्यास सज्ज झाली.व्यावहारिक जगात कामात असताना प्रत्येकालाच सुटी हवी असते. मात्र, जबरी सुटीवर पाठविल्यास तोच माणूस निराशेच्या गर्तेत शिरायला लागतो. टाळेबंदीच्या अडीच महिन्यात अशी स्थिती अनेकांची झाली आहे. मात्र, ड्रॉइंग टीचर असलेल्या पंकज कावळे यांनी टाळेबंदीलाच अस्त्र बनविले आणि पेपरवर्क, कॅन्व्हास पेंटिंग, ऑईल पेंटिंग, ग्राफिक्सचे स्केच रेखाटत कोरोनाचा हा बेरंगी काळ रंगाने भरून काढला. सर्वसामान्य माणसांप्रमाणेच त्यांनी आपल्या कलाकृती रोज फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या प्रचंड अशा फावल्या वेळेत आपण काय करतो आहोत, हेच दाखविण्याचा हा उद्देश होता. मात्र, आपल्या अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहिल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते, असे म्हणतात. नेमके तसेच झाले आणि त्यांच्या प्रत्येक पेंटिंग्जला आॅनलाईन ग्राहक प्राप्त झाले. या अडीच महिन्यात जवळपास अडीचशे पेंटिंग्ज त्यांनी काढल्या. त्यातून जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी अशा या उदासीनतेने ग्रासलेल्या काळात मिळवले. ‘बेरंगी दुनिया में रंग ढूंढना सीखो, उदासीन जिंदगी में जिंदगी ढूंढना सीखो’ अशीच बाब कावळे यांच्या या कलावैभवावरून स्पष्ट होते.वेळ रिकामा होता, मी नाही : पंकज कावळेमी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर ड्रॉइंग टीचर आहे. टाळेबंदीत सुट्याच सुट्या होत्या आणि बाहेरही पडता येत नव्हते. भरपूर वेळ रिकामा असल्याने, याचा उपयोग अभिव्यक्ती बहरविण्यासाठी केला आणि कलाही बहरत गेली आणि बाजारपेठही. आता तर संधीच मिळाली आहे. त्यामुळे या कामाला जास्तीत जास्त वेळ देणार आहे. मी नाटक, सिनेमा या क्षेत्रातही संधी शोधत असल्याचे चित्रकार पंकज कावळे म्हणाले.
टाळेबंदीच्या औदासीन्यात बहरली चित्रकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 8:23 PM
कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि अनेक जण निराशेच्या सावटात शिरले गेले. मात्र, काही अवलियांनी या टाळेबंदीचे सोने करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे. नागपुरातील पंकज कावळे या हरहुन्नरी कलाकाराने टाळेबंदीच्या या औदासीन्यात आपल्यातील कलावंताला अधिकच बहर दिला आणि ध्यानीमनी नसताना सहजच ‘ऑनलाईन’ बाजारपेठ त्याचे स्वागत करण्यास सज्ज झाली.
ठळक मुद्देआत्मनिर्भरतेचा धडा : कलेला ‘ऑनलाईन’ बाजारपेठ मिळवत साधला रोजगार