नागपूर : व्हिजाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या आणि येथे राहून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका पाकिस्तानी दाम्पत्याविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विक्रमदास भजनदास पंचवानी (वय ४७) आणि जयवंती विक्रमदास पंचवानी (वय ४१), अशी आरोपींची नावे आहेत.
पंचवानी दाम्पत्य पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोतकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी ते मुलीच्या उपचाराच्या नावाखाली साक्षी (वय ४), साधना (वय ९), सुरक्षा (वय ११ वर्षे) नामक मुलींसह नागपुरात आले. येथे ते नारा मार्गावरील रुपम सोसायटीत राहत होते. २८ फेब्रुवारीला त्यांच्या व्हिजाची मुदत संपली. त्यानुसार त्यांनी आपल्या देशात परत जायला हवे होते. मात्र, विक्रमदास नागपुरातून निघून गेला तर, इतरांनी येथेच मुक्काम ठोकला. तत्पूर्वी, विक्रमदास आणि त्याच्या पत्नीने सुरक्षा नामक मुलीच्या उपचारामुळे तिला आरामाची गरज असल्यामुळे आणखी एक महिना आम्हाला येथे राहण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज त्यांनी विशेष शाखेत केला. त्यासाठी त्यांनी मेयोतून मिळवलेले मुलीच्या आजार आणि उपचाराचे एक वैद्यकीय प्रमाणपत्रही पोलिसांच्या विशेष शाखेत सादर केले. विशेष शाखेने हे प्रमाणपत्र शहानिशा करण्यासाठी जरीपटका पोलिसांकडे पाठविले आणि चौकशीच्या सूचना केल्या.
मेयोचे प्रमाणपत्र बनावटजरीपटका पोलिसांनी चौकशी केली असता, ते वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मेयोतील संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही ते प्रमाणपत्र संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना दिले नसून, तशी आमच्याकडे कोणती नोंदही नसल्याचे सांगितले. अर्थात पंचवानी दाम्पत्याने भारतात अवैध वास्तव्य करतानाच बनावट प्रमाणपत्र देऊन पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याचेही स्पष्ट झाल्याने जरीपटका पोलिसांनी या दाम्पत्याविरुद्ध २६ मार्चला कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ भादंवि तसेच विदेशी नागरिक वास्तव्य अधिनियम १९६४ चे सहकलम १४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला.