- सोपान पांढरीपांडे नागपूर : सरकारने साखरेवरील आयात कर ५० वरून १०० टक्के केल्यानंतरही भारतात पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात साखर आयात होत असल्याने कारखानदारांना फटका बसणार आहे.सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह ठाणे जिल्ह्यातील दहिसर-मोरी गावातील व्हिडी लॉजिस्टिक्सच्या गोदामावर हल्लाबोल आंदोलन केले. पाकिस्तानातील चिस्तियन व लालूवल्लू या ब्रँडच्या साखर साठ्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर टाकला. ‘लोकमत’शी बोलताना आव्हाड म्हणाले की, ही साखर मुंबईच्या सुकुमार एक्स्पोर्ट इम्पोर्टस् कंपनीने आयात केलेल्या ४७०० टन साखर साठ्यापैकी आहे. ही साखर भारतात कशी आली, त्याची चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. यापूर्वीही पाकिस्तानी साखर नवी मुंबई व पंजाब, हरियाणामधील गावांमध्ये उपलब्ध असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर झळकल्या आहेत.इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार म्हणाले, ही साखर आयात कर वाढण्यापूर्वी आलेली असावी अशी शक्यता आहे. भारतीय साखरेपेक्षा एक ते दोन रु. प्रति किलो ती स्वस्त विकली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कारखानदारांवर दबाव आणला आहे. कारखानदारांना घाऊक व्यापाºयांना साखर २४ ते २५ रुपये किलो दराने विकावी लागत आहे. साखरेचा उत्पादन खर्च ३२ ते ३४ रुपये किलो येतो. तीन महिन्यांपूर्वी साखरेचे किरकोळ दर ४० ते ४२ रुपये होते. ते आता ३६ ते ३८ रुपयांवर आले आहेत. पाकिस्तानी साखरेमुळे प्रत्येक कारखान्याला किलोमागे ९ ते १० रुपये नुकसान सहन करावे लागत आहे. भारतातील ४९३ साखर कारखानदारांना अशा तºहेने २२ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता पवार यांनी बोलून दाखविली.पाकिस्तानात साखरेचा उत्पादन खर्च १८ रुपये प्रति किलो आहे. १०० टक्के आयात करानंतर किलोमागे साखर ३६ ते ४० रुपयांत पडेल. त्यामुळे ही साखर कशी आली हे शोधणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी सरकारने चौकशी करून ही आयात बंद केली पाहिजे, असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचाक डॉ. अबिनाश वर्मा यांनी सांगितले.भारतात गेल्या वर्षीची ४.५० दशलक्ष टन साखर शिल्लक आहे. यावर्षी आतापर्यंत ३१ दशलक्ष टन साखर तयार झाली आहे. त्यामुळे एकूण उपलब्धता ३५.५० दशलक्ष टन झाली आहे. त्या प्रमाणात मागणी फक्त २५ दशलक्ष टनाची असल्याने देशात १० दशलक्ष टन अतिरिक्त साखर उत्पादन झाले आहे.>ठाण्यात हल्लाबोलसोमवारी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह दहिसर-मोरी येथील गोदामांवर हल्लाबोल करून पाकिस्तानातून आलेल्या दोन हजार मेट्रीक टन साखरेपैकी काही गोण्यांवर ‘हल्लाबोल’ आंदोलन करून ती नष्ट केली.
पाकिस्तानी साखरेमुळे कारखानदारांना फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:20 AM