श्रीसूर्या फसवणूक प्रकरण : राज्य शासनाला नोटीस नागपूर : विदर्भातील विविध पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आलेले एफआयआर नागपूर येथे स्थानांतरित करण्यासाठी श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी व श्रीसूर्या ड्रिम डेस्टिनेशन कंपनीची संचालिका पल्लवी जोशीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर शासनाला नोटीस बजावून यावर १४ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी जोशी व अन्य आरोपींविरुद्ध नागपूर, अकोला, यवतमाळ व अमरावती येथील पोलीस ठाण्यात पीडित गुंतवणूकदारांच्या तक्रारींवरून एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. श्रीसूर्या समूहांतर्गत गुंतवणूक कंपनीसह बांधकाम, दूध, रेस्टॉरेंट्स, व्यायामशाळा, परिवहन, रुग्णालये, विमा इत्यादी विविध व्यवसाय होते. जोशी दाम्पत्याने १८ महिन्यांत रक्कम दुप्पट करून देणे, २५ महिन्यांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देणे अशा विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. जोशी दाम्पत्य चर्चासत्र व एजंट्सच्या माध्यमातून योजनांचा प्रचार करीत होते. जोशी यांच्यातर्फे अॅड. ए. एम. घारे तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
एफआयआर एकत्रीकरणासाठी पल्लवी जोशी हायकोर्टात
By admin | Published: February 25, 2017 2:06 AM