ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांना रविवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपुरामधील धंतोलीस्थित न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात अर्धांगवायूचा झटका आला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आल्याने डॉक्टरांनी तत्काळ एमआरआय काढला. परंतु अहवाल सामान्य आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. खा. पटोले यांची प्रकृती सामान्य असल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी सांगितले.रविवारी भंडारा येथील साकोली तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणीबांध येथे विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून खा. पटोले उपस्थित होते. स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवित असताना खा. पटोले यांना अचानक भोवळ आली. त्यांना लागलीच स्पर्धेत उपस्थित डॉक्टरांनी तपासले. तेथून स्थानिक रुग्णालयात नेऊन १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्सने तत्काळ नागपूर गाठून न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. यामुळे न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक व न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी तत्काळ एमआरआय काढला. याचा अहवाल सामान्य आला. या संदर्भात लोकमतशी बोलताना डॉ. पाखमोडे म्हणाले, त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांकडून कळले की, खा. पटोले हे शनिवारी भिलाई येथे होते. रविवारी सकाळी पहाटे ते थेट साकोली येथील कार्यक्रमात पोहोचले. झोप नीट झाली नसावी व धावपळीमुळे प्रकृती अस्वस्थ झाली असावी. सध्या त्यांची प्रकृती सामान्य असलीतरी पुढील २४ तास डॉक्टरांची चमू त्यांच्याकडे लक्ष ठेवून असणार आहे. सर्व काही सामान्य असल्यास सोमवारी सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. खा. पटोले यांच्या सोबत आ. परिणय फुके, सुनील कुंडे आदी उपस्थित होते.