नागपूर : जिल्ह्यातील १३ पंचायत समितींच्या सभापतीचे आरक्षण सोमवारी निघाले. १५ ऑक्टोबर रोजी सभापती, उपसभापतीच्या निवडणुका होणार आहेत. गेल्या वेळीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन्ही पंचायत समिती हातून जाणार आहेत.
सद्य:स्थितीत १३ पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ८ सभापती आहेत. नरखेड आणि हिंगणा पंचायत समितीवर राष्ट्रवादी तर काटोल पंचायत समितीवर शेकापचा सभापती आहे. भाजपाच्या ताब्यात कामठी व कुही पंचायत समिती आहे. कामठीमध्ये गेल्यावर्षी ईश्वरचिठ्ठीने भाजपाचा सभापती झाला होता. परंतु झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा सदस्य वाढल्याने ८ सदस्यांपैकी ५ सदस्य काँग्रेसचे आहेत. कुहीमध्ये भाजपाचा सभापती होता. परंतु यंदा सभापतीचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित झाले आहे. या प्रवर्गात काँग्रेसकडेच सदस्य आहेत. त्यामुळे ही पंचायत समितीदेखील भाजपाच्या हातून जाणार आहे. काटोल पंचायत समितीमध्ये सध्या शेकापचा सभापती आहे. नव्या सभापतीसाठी निघालेले आरक्षण हे नामप्र प्रवर्गातील असून, या प्रवर्गात राष्ट्रवादीकडे सदस्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- कळमेश्वरमध्ये आरक्षित प्रवर्गात सदस्यच नाही
कळमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला निघाले आहे. परंतु येथे या प्रवर्गातील सदस्यच नाही. त्यामुळे येथील सभापतीच्या निवडीसंदर्भात आयोगाकडे मार्गदर्शन मागण्यात येणार आहे.
- असे आहे सभापती पदाचे आरक्षण
नरखेड : अनुसूचित जमाती काटोल : ना. म. प्र.
कळमेश्वर : अनुसूचित जमाती महिला
सावनेर : सर्वसाधारण
पारशिवणी : सर्वसाधारण
रामटेक : सर्वसाधारण
मौदा : सर्वसाधारण
कामठी : सर्वसाधारण महिला
नागपूर : अनुसूचित जाती
हिंगणा : सर्वसाधारण महिला
उमरेड : ना. म. प्र. महिला
भिवापूर : सर्वसाधारण महिला
कुही : अनुसूचित जाती महिला
सभापतीपदाचे आरक्षण जाहीर
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून सोमवारी जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोडत पद्धतीने जाहीर केले. सोडत शालेय मुलींच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती नेमावली माटे, उज्ज्वला बोढारे, उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते.