लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराची प्रेयसी वंदना (वय २७) हिचा या दरोड्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली. गुरुवारी तिला न्यायालयात हजर करून तिचा १० जुलैपर्यंत पीसीआर मिळवला. ‘लोकमत’ने पहिल्याच दिवशी दरोड्यात महिलेचा सहभाग असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
जरीपटक्यातील भीम चौकाजवळ असलेल्या अवनी ज्वेलर्समध्ये चार दरोडेखोरांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता दरोडा घातला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढत वीरेंद्रकुमार सुखदेव (वय २६, रा. गोथनी, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) आणि दीपक राजकुमार त्रिपाठी (२४, रा. गंगानगर, मऊ, अलाहाबाद) या दोघांना जबलपूर-कटनीजवळ अटक केली. मुख्य सूत्रधार कृष्णा पांडे आणि पिंकू फरार आहे. पोलीस चाैकशीत कृष्णा पांडेसोबत वंदनाचे प्रेमप्रकरण सुरू असून १ जुलैला कृष्णा-वंदनाने आशिषच्या दुकानात येऊन नथ खरेदी करण्याच्या बहाण्याने रेकी केली होती. कमाल चाैक पाचपावलीतीलही एका दुकानात रेकी केली होती. कृष्णा पांडे साथीदारांसह दरोडा घालणार आहे, याची तिला कल्पना होती. मात्र, तिने त्यांना परावृत्त करण्याचे किंवा पोलिसांना सूचित करण्याचे टाळले. त्याचमुळे हा गुन्हा घडला. तिचा या गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने बुधवारी वंदनाला या गुन्ह्यात आरोपी बनवून पोलिसांनी तिला गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
---
उत्तर प्रदेशातील घरावर नजर
सराईत गुन्हेगार असलेला पांडे त्याच्या साथीदारासह जबलपूरच्या जंगलातून पळून गेला. त्याचा दोन दिवस सतत शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे आता त्याच्या उत्तर प्रदेशातील घरावर नजर केंद्रित केली आहे.
---