लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यापाऱ्यांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा ठगबाज पंकज नंदलाल मेहाडिया (वय ४५, रा. न्यू रामदासपेठ) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यातील अन्य आरोपींची नावे प्रेमलता नंदलाल मेहाडिया (वय ७२), लोकेश संतोष जैन (वय ४३, रा. सदर), कार्तिक संतोष जैन (वय ४०, रा. सदर) आणि बालमुकुंद लालचंद केयाल (वय ५५, रा. देशपांडे लेआऊट) अशी असून पोलिसांनी आरोपी पंकज मेहाडियाला मंगळवारी अटक केली आहे.
रामदासपेठेतील रहिवासी अशोक पुरुषोत्तम अग्रवाल (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ मध्ये ठगबाज पंकज आणि साथीदारांनी त्यांच्या मे. लोकेश मेटॅलिक्स, मे. मेहाडिया सेल्स ॲन्ड ट्रेड कॉर्पोरेशन आणि मे. नंदलाल डी. मेहाडिया या तीन खासगी फर्ममध्ये अधिक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास बाध्य केले. आरोपी संपर्कातील असल्याने त्याच्यावर विश्वास करून अग्रवाल तसेच त्यांच्या नातेवाइकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली.
प्रारंभी तीन वर्षे ठगबाज मेहाडिया आणि साथीदारांनी अग्रवाल तसेच त्यांच्या नातेवाइकांना व्याजाच्या रकमेचा परतावा दिला. ही रक्कमही अग्रवाल आणि नातेवाइकांनी आरोपींच्या फर्ममध्येच गुंतविली. नंतर मात्र आरोपींनी मूळ रक्कम ४ कोटी, ७१ लाख, ६२,०४४ रुपये तसेच त्यावरचे व्याज ३ कोटी, ४४ लाख, ४६, ४७४ रुपये असे एकूण ८ कोटी, १६ लाख, ८५१८ रुपये परत केले नाहीत. यासंबंधाने वारंवार मागणी करूनही आरोपी केवळ टाळाटाळ करत होते.
तब्बल चार वर्षे पैसे परत करण्यासाठी अनेकांच्या साक्षीने आरोपींनी ग्वाही दिली. मात्र, रक्कम परत केली नाही. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार अग्रवाल यांनी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच मेहाडिया साथीदारांसह फरार झाला होता.
आरोपीला अटक आणि पीसीआर
गुन्हे शाखेच्या पथकाने शोधाशोध करून आरोपी पंकज मेहाडियाला मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ठगबाज पंकज मेहाडियाने अशाच प्रकारे अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.