माैदा : माेकळ्या जागेवर पडून असलेल्या कचऱ्याने पेट घेतला आणि वाळलेल्या गवतामुळे आग पसरत गेली. या आगीत पानटपरी व त्यातील साहित्याची राख झाल्याने किमान ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना माैदा शहरात गुरुवारी (दि. २७)सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
आशिष ताराचंद कुंभलकर यांची माैदा शहरातील वाॅर्ड क्रमांक-४ मधील एका रेस्टाॅरन्टसमाेर पानटपरी आहे. या वाॅर्डातील रामबाई साहू यांना त्याच्या घरासमाेरील कचऱ्याने पेट घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही बाब इतरांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र वाळलेले गवत व वाहत्या हवेमुळे ही आग पसरत गेली. त्यात याच परिसरात असलेल्या आशिष कुंभलकर यांच्या पानटपरीने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग नियंत्रणात येईपर्यंत पानटपरी व त्यातील संपूर्ण साहित्याची राख झाली हाेती. यात किमान ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आशिष कुंभलकर यांनी दिली. माहिती मिळताच नगरपंचायत, पाेलीस, महावितरण कंपनी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.