लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा अखेर रविवारी पार पडली. नागपुरात परीक्षार्थ्यांनी कोरोना संसर्गाच्या भीतीतही पेपर सोडवला. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर कोरोनाच्या भीतीपासून मुक्त ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या.
येथे विद्यार्थ्यांसाठी मास्क, हॅण्डग्लोव्हज्, सॅनिटायझर देण्यात आले होते. यासोबतच एमपीएससीतर्फे जारी गाईडलाईननुसार बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना संसर्गित व कोविडची लक्षणे असलेल्या परीक्षार्थ्यांसाठी सुद्धा स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह पीपीई किटचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार शहरात कुठल्याही केंद्रावर कोविड रुग्ण किंवा लक्षणे असलेला एकही विद्यार्थी आला नाही. बहुतांश केंद्रांवर परीक्षार्थ्यांची उपस्थिती ७० ते ७२ टक्के राहिली. काही परीक्षा केंद्रांवर ८० ते ९५ टक्के इतकी उपस्थिती होती. केंद्रांवर दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही सत्रातील परीक्षा शांततेत पार पडली. कुठल्याही केंद्रावर अनुचित घटनेची तक्रार मिळाली नाही. पेपर सोडविल्यानंतर केंद्रातून बाहेर पडलेल्या काही परीक्षार्थ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अनेकदा ही परीक्षा रद्द झाली. त्यामुळे निराशा निर्माण झाली होती. तसेच तणावही होता. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने परीक्षा घेण्यात आली. परंतु पूर्वीसारखा उत्साह नव्हता. पेपर चांगला सोडवला. आता निकालच सांगेल की पेपर कसा गेला. परीक्षा केंद्रांवर करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपायांवर परीक्षार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, केंद्रावर येण्यापूर्वी त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. कोरोना संसर्गाची भीतीही होती. परंतु केंद्रावर केलेल्या सुरक्षेच्या व्यवस्थेमुळे समाधान वाटले.
पोलिसांनी केले सहकार्य
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. यामुळे परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी त्रास सहन करावा लागेल, अशी परीक्षार्थ्यांना शंका होती. त्यांची ही चिंता लक्षात घेऊन एक दिवसापूर्वीच वाहतूक पोलीस विभागातर्फे परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, असा विश्वास देण्यात आला होता. रविवारी हा विश्वास सार्थही ठरला. परीक्षेसाठी जाणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवताच कुठलीही विचारपूस न करता जाऊ देण्यात आले. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी वेळेवर पोहोचले.