नागपूर : गुंतवणुकीच्या नावाखाली विदर्भासह विविध ठिकाणी अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हसनबाग येथील कुख्यात ठकबाज परवेज उर्फ पप्पू पटेल याला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा दिवसांनी पप्पूला पोलिसांनी पकडले. चौकशीदरम्यान पोलिस त्याच्या आणखी ‘लिंक’ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
मालमत्तेत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली पप्पूने अनेकांना गंडा घातला आहे. तीन महिन्यांत दुप्पट रक्कम परत करण्याचे आश्वासन देतच त्याच्या टोळीने अनेकांना जाळ्यात ओढले. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्याची हिंमत आणखी वाढली. मे महिन्यात नंदनवन पोलिसांनी फसवणूक प्रकरणात पप्पूसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला.
१८ ऑक्टोबर रोजी एटीएसने पप्पूच्या हसनबाग येथील बिलाल एंटरप्रायझेसवर छापा टाकून २७.५० लाख रुपये रोख आणि कागदपत्रे जप्त केली होती. पप्पू बनावट नोटांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. मे महिन्यात झालेल्या अटकेमुळे पप्पू सावध झाला होता.
विक्रम हसोरिया यांनी केली होती तक्रार
पप्पूने फसवणूक केलेला किराणा व्यापारी विक्रम हसोरिया एटीएसपर्यंत पोहोचला होता. तीन महिन्यांत दुप्पट रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन पप्पू आणि त्याच्या साथीदारांनी हसोरिया आणि त्याच्या नातेवाइकांची ५० लाखांची फसवणूक केली होती. त्यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी परवेज उर्फ पप्पू पटेल, इर्शाद, अब्दुल वसीम, अकील उर्फ गुड्डू पटेल आणि उमेशकुमार यादव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच माहिती मिळाल्याने पप्पू फरार झाला होता. मंगळवारी त्याला पोलिसांनी पकडले. त्याचे रॅकेट विदर्भासह अनेक शेजारील जिल्ह्यात पसरले होते.