लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारवाईचा धाक दाखवून धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांकडून लाखोंची तोडी केल्याच्या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी सकाळी ठाणेदार आणि पोलीस उपनिरीक्षकांची ‘परेड’ घेतली.
यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एका पीएसआयसह चाैघांची विकेट गेली असली तरी धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना संरक्षण देऊन महिन्याला लाखोंची तोडी करणारे अनेक मुरलेले खेळाडू कारवाईपासून दूर आहेत. त्यात काही जण मुख्यालय परिसरातून विनोद आणि बालासारखे वसुलीबाज तर काही जण पोलीस ठाण्यातून डावपेच लढवतात. सर्वाधिक वसुलीसाठी कळमन्यात आकरे, लकडगंजमध्ये नितीन आणि जरीपटक्यात रोशन वादग्रस्त आहे. ‘लोकमत’ने या संबंधीचे वृत्त आज प्रकाशित केल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी सकाळी शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) आणि पोलीस उपनिरीक्षकांना मुख्यालयाच्या ग्राउंडवर बोलवले. तेथे त्यांची परेड घेतल्यानंतर गुन्हेगारी आणि अवैध धंदे संपवा. खाबूगिरीच्या प्रवृत्तीमुळे प्रतिमा बिघडवू नका, असे सांगतानाच यशोधरानगर सारखे प्रकरण पुन्हा कुठे झाले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही दिला. तोडपाणीत कनिष्ठांना समोर करून स्वत:ला सेफ ठेवण्याचा प्रकार लक्षात येत असल्याचेही त्यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. कर्तव्यकठोर बनून स्वच्छ आणि पारदर्शी काम करा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा, असा सज्जड दमही त्यांनी ठाणेदारांना दिला.
सांभाळून करण्याच्या सूचना
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या परेडनंतर दुपारी कळमना ठाण्यात कळस गाठणारी घडामोड घडली. खाबूगिरीत गुंतलेल्या एकाने वसुलीबाजांना ‘यापुढे जे काही करायचे ते सांभाळून करा, खुलेआम काहीही करू नका’, अशी सूचना वजा सल्ला दिल्याचे समजते. दरम्यान, बाहेर बाहेर राहून वसुली करवून घेणाऱ्यांना कारवाईचा झटका देण्याची गरज खुद्द पोलीस दलातूनच विशद केली जात आहे.