लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेच नव्हे तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांचीही भूमिका संशयास्पद आहे. त्या संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यामुळेच मी हायकोर्टात धाव घेतली आहे, असे वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केले.
१०० कोटींच्या वसुलीचे टारगेट दिल्याचा आरोप करून सिंग यांनी देशमुखच नव्हे तर राज्य सरकारलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उठलेल्या राजकीय वादळामुळे देशमुखांना गृहमंत्रिपद सोडावे लागले आणि आता त्यांची सीबीआय चौकशीही सुरू आहे. १० दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने या प्रकरणाच्या संबंधाने देशमुख यांच्या नागपुरातील घरी छापा मारून त्यांची १३ तास चौकशीही केली. यानंतर देशमुख प्रथमच परमबिर सिंग यांच्यावर खुलेपणाने बोलले. आज सायंकाळी विमानतळावर पत्रकारांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर परमबिर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप आता समोर येत आहेत.
सचिन वाझे आणि परमबिर सिंग यांच्या चुका गंभीर आणि माफ करण्यालायक नव्हत्या. त्यामुळे मी गृहमंत्री असताना त्यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली केली होती. एका कार्यक्रमात यासंदर्भात मी जाहीर वक्तव्यसुद्धा केले होते. त्यामुळे दुखावलेल्या सिंग यांनी द्वेषभावनेतून माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप नाही. परमबिर सिंग यांच्या खोट्या आरोपावरून माझ्यावर सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, असेही देशमुख म्हणाले.