मंत्रिमहोदय आता करणार का कारवाई? : पालकांच्या तक्रारी नसल्याने प्रशासन कारवाईस हतबल
नागपूर : नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या विरोधात पालकांच्या तक्रारीच नसल्याचा हवाला देत, कारवाई करण्यास शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व खुद्द मंत्रिमहोदयांनी हतबलता दाखविली होती. ज्या पालकांची फसवणूक झाली त्यांनी २४ डिसेंबर रोजी प्राथमिक शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालकांकडे शाळेने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन घेईल का? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या पाल्याचे पालक प्रशांत चकोले यांनी शाळेने फसवणूक केल्यासंदर्भात तक्रार केली आहे. प्रशांत चकोले यांनी मुलाची शैक्षणिक प्रगती व शाळेच्या अध्यापनासंदर्भात असमाधान व्यक्त करीत सहा महिन्यापूर्वी शाळेकडे टीसी मागितली होती. सहा महिन्यानंतर त्यांना किड्स प्ले इंग्लिश प्रायमरी स्कूल, दाभा या शाळेची टीसी दिली. त्या शाळेच्या टीसीवर असलेल्या युडाईज नंबर हा दुसऱ्याच शाळेचा होता. त्यामुळे त्यांच्या मुलाचा पुढच्या वर्गातील प्रवेश अडचणीत आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले की, नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये मी ६५ हजार रुपये शैक्षणिक शुल्क नियमितपणे भरले, तरीही शाळा व्यवस्थापनाने माझ्यासोबत फसवणुकीचा प्रकार केला. त्यांनी या आशयाची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली आहे.
लोकमतने नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या संदर्भातील बनवाबनवी उजेडात आणली होती. शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली होती. पण पालकांची तक्रार नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, अशी हतबलता शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखविली होती. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे नागपूरला आले असता, त्यांनाही शाळेच्या बोगसपणाबद्दल विचारले असता, त्यांनी पालकांची तक्रार नसल्याचे सांगून कारवाई करण्यास नकार दिला होता. पोलीस प्रशासनाकडूनही अशाच प्रकारचे उत्तर आले होेते. परंतु आता पालकांनीच पुढे येऊन न्यायासाठी विभागाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे हतबल झालेले प्रशासन शाळेविरुद्ध कणखर भूमिका घेईल का? याची प्रतीक्षा आहे.