नागपूर : ज्या जन्मदात्यांनी लहानाचे मोठे केले त्यांनाच आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या कष्टाच्या घरातून बेघर करण्याचा एका मुलाचा प्रयत्न समोर आला आहे. त्याच्या छळामुळे कंटाळलेल्या वडिलांना अखेर पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली. हा प्रकार ऐकून पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला.
अमित बरगट (३९) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. मधुकर बरगट (७०, कविता अपार्टमेंट, बेलतरोडी) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. ते सेवानिवृत्त झाले असून फ्लॅट त्यांच्याच नावावर आहे. त्यांना दोन मुले आहेत. अमितचे २००५ साली लग्न झाले होते व त्याला मुलगीदेखील आहे. सततच्या भांडणाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली व तो आई-वडिलांकडेच राहतो. अमितच्या शिवीगाळीमुळे लहान मुलगा लग्नानंतर वेगळा राहायला लागला. अमित कुठलेच काम करत नाही व दारूसाठी तो पैशांचा तगादा लावतो. त्याने अनेकदा त्याच्या आईला व मुलीला मारहाण केली असून जिवे मारण्याचीदेखील धमकी दिली आहे.
काही दिवसांअगोदर अमित रात्री दारू पिऊन घरी आला व त्याने आई-वडिलांना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्याने फ्लॅट त्याच्या नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ सुरू केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाणदेखील केली. पाणी डोक्यावरून जात असल्याने अखेर त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.