विजय भुते
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : काेराेना महामारी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. काहींचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. गरिबांच्या मुलांना ही सुविधाही मिळाली नाही. घरी राहून विद्यार्थ्यांसह पालक वैतागले आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही हाेत आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. त्यानंतर जून-२०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. परंतु शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या नाहीत. जुलैमध्ये शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच १७ ऑगस्टपासून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर हा निर्णय बारगळला. त्यातच दिवाळीनंतर या शाळा सुरू होण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर लग्न, हॉटेल, बार, दुकाने, मॉल, बस, रेल्वे यासह इतर बाबींना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचा आराेप काही शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे. प्रशासन व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. टास्क फोर्समधील तज्ज्ञांचा शाळा सुरू करण्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
..
बालमनावर विपरीत परिणाम
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकर ठाेस निर्णय घेत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त हाेत आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नसल्याने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा खेळखंडाेबा हाेत असल्याचा आराेप पालकांनी केला आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम हाेत असल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली असून, याला पालकांसह डाॅक्टरांनी दुजाेरा दिला आहे. मुलांच्या वर्तनात बदल जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
शिक्षणातील रुची कमी
मुले घरी असल्याने ती पालकांसाेबत राेज गर्दीत जात आहेत. काही शेतात काम करतात तर काही गटागटाने खेळत असतात. यात त्यांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययाेजनांचे भान नसते. त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणातील रुची कमी हाेत असल्याचेही पालकांनी सांगितले. याबाबत शिक्षकांच्या संघटना आक्रमक भूमिका न घेता गप्प असल्याचा आराेप काही पालकांनी केला आहे.
...
कोरोना संक्रमण कमी झाले की निर्बंध उठविले जातात. वाढले की पुन्हा लावले जातात. हाच निकष शाळेला लावून शाळा सुरू कराव्यात. किमान या कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षण होईल.
- खुशाल कापसे, शिक्षक,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गरंडा.
...
शाळा बंद असल्याने मुले आमच्यासोबत लग्न, बारसे, बाजार, इतर घरगुती कार्यक्रमात येतात. आम्ही दिवसभर शेतात असतो, तेव्हा मुले घोळक्याने गावात खेळतात. शाळा सुरू झाल्या तर ते शाळेत सुरक्षित राहतील व शिक्षणही होईल. त्यामुळे सरकारने लवकर शाळा सुरू कराव्यात.
- राजेश गोमकाळे, पालक.