लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वाहन घेऊन बेदरकारपणे शहरात फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना सांभाळा. त्यांच्या हातात वाहन देऊन त्यांचा तसेच दुसऱ्याचा जीव धोक्यात आणू नका, असा सल्ला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी पालकांना दिला.
नागपूरला अपघातमुक्त शहर बनविण्याच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेतर्फे पोलीस जिमखान्यात सोमवारी सायंकाळी ५ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अल्पवयीन मुलांकडून वेगात वाहन चालविण्याच्या घटना सर्वत्र बघायला मिळतात. अनेकदा ते मूळ वाहनाची बनावट बदलवतात. फॅन्सी नंबरप्लेट आणि ट्रिपल सीट वाहन चालविताना अनेकजण विना हेल्मेटने वाहन चालविताना दिसतात. वाहनांची कागदपत्रेही त्यांच्याकडे नसतात. हे प्रकार गंभीर आहेत. मुलांचे वय नसल्याने त्यांना ती जाण नसली तरी पालकांना मात्र त्याचे गांभीर्य कळावे म्हणून पोलीस आयुक्तांनी बैठकीत उपस्थित पालकांना आणि युवकांना मार्गदर्शन केले. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका, असेही त्यांनी पालकांना यावेळी आवाहन केले. प्रारंभी वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग अवाड यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला १०० पेक्षा जास्त पालक तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---