फुकेंचा तायवाडेंना काँग्रेस सोडण्याचा सल्ला, तर चव्हाण यांची फुकेंनाच ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:52 PM2023-02-15T12:52:29+5:302023-02-15T12:56:20+5:30
तायवाडेंच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात रंगला राजकीय कलगीतुरा
नागपूर : डॉ. बबनराव तायवाडे हे काँग्रेसमध्ये राहून कधीच आमदार होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडावी व ओबीसी चळवळीचे काम आणखी व्यापक करावे, असा सल्ला भाजपचे माजी आमदार परिणय फुके यांनी दिला, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेसचेच वातावरण मस्त असल्याचे सांगत तुम्हीच इकडे येऊन जा, अशी उलट ऑफर फुके यांना दिली.
अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व डॉ. शरयू तायवाडे यांचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड होते. मंचावर माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, माजी आ. परिणय फुके, नरेश ठाकरे, दीनानाथ पडोळे, डॉ. अक्षयकुमार काळे, अशोक जीवतोडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. तायवाडे यांच्या राजकीय वाटचालीवरून उपस्थित नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.
फुके हे तायवाडे यांना म्हणाले, एकदा माझे ऐकून बघा, काँग्रेस सोडून बघा. ओबीसीचे नेते म्हणून एवढे मोठे व्हाल की कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आधी तुमच्या दारात यावे लागेल. त्यावर आमदार सुनील केदार यांनी आपण फुके यांच्या मताशी सहमत नसल्याचे सांगत काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते, असे सुचक वक्तव्य केले. अशोक चव्हाण यांनीही हाच धागा धरत सर्वांनी साथ दिली तर आपणही भक्कमपणे तायवाडे यांच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. तायवाडे हे कुठलाही राजकीय आधार न घेता ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. योग्य संधी येईल तेव्हा त्यांना नक्कीच न्याय दिला जाईल, असेही चव्हाण यांनी आश्वस्त केले.
तायवाडे म्हणाले, किंग नव्हे किंगमेकर व्हायचेय
- नेत्यांची राजकीय टोलेबाजी ऐकून सत्काराला उत्तर देताना तायवाडे म्हणाले, आता माझे वय असे आहे की किंग होण्यापेक्षा किंगमेकर होणे अधिक चांगले आहे. लोकांच्या प्रेमामुळे मी इथवर आलो. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मिळालेला विजय हा काँग्रेसच्या विचाराचा विजय असल्याचे सांगत त्यांनी आपली काँग्रेसवरील निष्ठा अधोरेखित केली.