नागपूर : राज्यातील ९ घटक पक्षांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती उभारली आहे. या महाशक्तीचे १२१ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील व महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा महाशक्तीच्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे.
परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले स्वराज्य पार्टीचे छत्रपती संभाजी महाराज, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्तीचे आ. बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, खोरिपाचे उपेंद्र शेंडे आदींनी एकत्र येत सोमवारी पत्रकार परिषदेत उमेदवारी लढविण्यासंबंधीची घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, राज्यात एक सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी समाज हितासाठी निर्णय घेतला आहे. दोन दिवसात आम्ही त्यांची भेट घेऊन चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
परिवर्तन महाशक्ती राज्यात एक सशक्त पर्याय देईल व प्रस्थापितांना शह देऊ, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. बच्चू कडू यांनीही चौफेर चौकार मारणार असल्याचे सांगत ही वंचिताची लढाई असल्याचे सांगितले. वामनराव चटप यांनी यावेळी जनतेने परिवर्तन महाशक्तीला साथ देण्याचे आवाहन केले.
दिल को देखो, चेहरा न देखो
- परिवर्तन महाशक्तीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, अशी विचारणा केली असता बच्चू कडू यांनी चेहरा वेळेवर दिला जाईल, असे सांगितले. राजू शेट्टी यांनी हा प्रश्न शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांनाही करा, अशी पत्रकारांनाच सूचना केली, तर वामनराव चटप यांनी ‘दिल को देखो, चेहरा न देखो’ म्हणत विषयाला बगल दिली.