लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सर्वात जुनी बाग असलेल्या म्हाळगीनगर परिसरातील शिवाजीनगर पार्कचे सौंदर्य खुलविण्यात प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. येथील ग्रीन जिमचे साहित्य मोडलेल्या अवस्थेत होते. मात्र, शासन - प्रशासन या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने या पार्कमधील व्यायामशाळा पुन्हा सुरू झाली आहे.
पंकज साठवणे हे या बागेत नेहमी येत असतात. मात्र, बागेची जागा समतल नाही, वृक्ष - रोपट्यांची निगा राखली जात नाही आणि मुलांसाठी व आरोग्यवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या व्यायामाच्या साहित्याची मोडतोड झाल्याचे त्यांच्या नेहमी निदर्शनास येत होते. शासन व प्रशासनाकडे याबाबत बोलूनही दुरावस्था दूर झाली नाही, हे बघून साठवणे आणि त्यांच्या साथीदारांनी व्यायामाचे नवे साहित्य आणून ग्रीन जिम सुरू करण्याचे प्रयत्न केले आहे. त्यांच्या या दातृत्त्वाचे कौतुक केले जात आहे. आता सकाळ - संध्याकाळी लहान मुले, वृद्ध व तरुण या व्यायामाच्या साहित्याचा वापर करून आपले आरोग्य सुदृढ करत आहेत. हे साहित्य नव्याने लावण्यात आले, त्यावेळी विशाल कोरके, राजेश कानपिल्लेवार, राजू गौतम, सुरेंद्र राऊत, राजू धानोरे, सावरकर गुरुजी, राजेश नागोसे, सोनू धनविजय, योगेश सोनारे, चंदू बिहारे, नीलेश गावंडे, दीपक चव्हाण, मनीष पवार, गणेश नरड, शांतनू मानकर, राहुल साठवणे, अमोल बहेकर, भूषण कुंटे, सोनी, आशिष भोयर, श्रीकांत खंडाळे, किरण शेळके उपस्थित होते.
प्रशासनाने आता तरी जागे व्हावे
नागरिकांसाठी केलेल्या सुविधांची निगा राखणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. मात्र, त्याला प्रशासनाने आधार देणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कच्या बाबतीत नागरिकांनी आपले कर्तव्य बजावले. आता प्रशासनाने जागे होण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.