प्रवीण खापरे
नागपूर : व्यापारस्थळी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी प्रशासनाने आणि संबंधित व्यवस्थापनाने वाहनतळाची (पार्किंग) योजना करणे आणि ही सेवा नि:शुल्क देणे बंधनकारक आहे. असे असतानाही मॉल/मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाहनतळाचे शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क घेतले जात असतानाच ‘पार्किंग ॲट ओनर्स रिस्क’ असा पुकाराही केला जात आहे. जर वाहनांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारायचीच नसेल तर शुल्क कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो. सीताबर्डी येथील इटर्निटी मॉलमध्ये असले नोटीस बोर्ड पार्किंग झोनमध्ये लावण्यात आले आहेत.
२०१९ मध्ये गुजरात हायकोर्टाने वाहनतळांबाबत मॉल/मल्टिप्लेक्स संचालकांची चांगलीच कानउघडणी केली होती. देशातील उच्च न्यायालयाच्या ठिकठिकाणातील बेंचनेही पार्किंग झोनमधून वाहन चोरी गेल्याच्या प्रकरणात संबंधित व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. ग्राहक न्यायालयाने अशा प्रकरणांत दंडही ठोठावला होता. मात्र, कायद्याचे भय या बलाढ्य अशा व्यापारी प्रतिष्ठानांना नाही. त्यामुळेच, येणाऱ्या ग्राहकांकडून वाहन ठेवण्यासाठी शुल्क आकारले जात आहे आणि ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या उक्तीप्रमाणे आम्ही शुल्क आकारत असलेल्या सेवेच्या मोबादल्यात वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असे नाक वर करून सांगितले जात आहे. शहरात असलेल्या इटर्निटी मॉलसोबतच अन्य मॉल, मल्टिप्लेक्समध्येही असाच हेका धरला जात आहे.
मॉलचालक जबाबदारी झटकू शकत नाही
वाहन कुठेही लावले तर ती जबाबदारी वाहनमालकाची असते. मात्र, मॉलमध्ये गाडी पार्क करताना त्याचे पैसे वसूल केले जात असेल तर वाहनांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी मॉलचालकांची असते. आपली जबाबदारी ते झटकू शकत नाही.
- जागवेंद्रसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक, ट्रॅफिक, नागपूर
शुल्कही अवाजवी
ग्राहकाकडूनच वाहन पार्क करण्याचे शुल्क घेतले जाते. विशेष म्हणजे, दुचाकीसाठी कुठल्याही ‘पे ॲण्ड पार्क’मध्ये १० रुपये सर्वोत्तम शुल्क आकारले जाते. चारचाकी असेल तर त्यासाठी २० रुपये आकारले जातात. मॉलमध्ये मात्र दुचाकीसाठी २५ रुपये आणि चारचाकीसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. शिवाय, चार तासाच्या वर वाहन उभे असेल तर प्रतितास १० रुपये शुल्क वाढविले जाते. मॉल, मल्टिप्लेक्समध्ये जसे नाश्ता, कोल्डड्रिंक, जेवणाचे दर दुपटीहून अधिक असते, अगदी तसेच पार्किंगचे दरही तिप्पट ठेवण्यात आले आहेत. सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ही ग्राहकांची लूटच केली जात आहे.
.........