लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरातील विदर्भ प्रीमियर कॉलनीत असलेल्या एका जीर्ण इमारतीचा भाग अचानक काेसळल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. शिवाय त्या इमारतीत वास्तव्याला असलेले कुटुंबही सुरक्षित आहेत.
या इमारतीचे बांधकाम विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून साधारणत: २० वर्षांपूर्वी करण्यात आल्याची माहिती या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी दिली. विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीने या काॅलनीत आणखी काही गाळ्यांचे बांधकाम केले आहे. यातील एका गाळ्याचे सिमेंट कॉंक्रीट काही दिवसांपासून निघायला व आतील लाेखंडी सळ्या उघड्या पडायला सुरुवात झाली हाेती. त्यामुळे येथील काही नागरिकांनी या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले हाेते. सिमेंट काॅंक्रीट निघाल्यानंतर उघड्या पडलेल्या सळ्या सडल्या असल्याचा आराेपही नागरिकांनी केला.
ज्या गाळ्याचा भाग काेसळला, ताे गाळा (कॉर्टर टाईप जी-२) महादेव चांभारे यांच्या मालकीचा असून, चंद्रशेखर डुंबरे यांच्या क्वार्टर टाईप एफ-२ सह अन्य काही इमारतींची अशीच अवस्था झाल्याचे दिसून येते. या संदर्भात आपण विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्यांनी आजवर काेणतीही कारवाई केली नाही, असेही या इमारतींमध्ये वास्तव्याला असणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले. या संदर्भात विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्या गाळ्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही गाळेमालकांची असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
...
जीवितहानीची शक्यता
स्थानिक नगर परिषद प्रशासनाने या काॅलनीतील काही इमारती धाेकादायक असून, त्या साेडण्याचे आदेश संबंधित नागरिकांना दिले हाेते. या इमारतींमध्ये त्यांचे मूळ मालक राहत नसून त्यांनी त्या भाड्याने दिल्या आहेत. मात्र, नागरिकांनी त्या इमारती अद्यापही साेडलेल्या नाहीत. त्यामुळे या जीर्ण झालेल्या इमारती कधीही काेसळण्याची आणि त्यातून माेठी जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.