नागपूर : कोराडी रोडवरील मानकापूर स्टेडियम ते फरसपर्यंत बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मानकापूर चौकात असलेल्या पुलाचा भाग कमजोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुलावरील रस्ता तोडून पुन्हा नव्याने सळाखी व काँक्रिट टाकून तयार केला जाणार आहे. नॅशनल हायवे ॲथॉरिटी (एनएचएआय)ने पुलाचा हा भाग कच्चा होण्यामागे वाढलेल्या प्रचंड ट्रॅफिकचे कारण पुढे केल्याचे सांगितले जात आहे. मात्र मार्च ते आतापर्यंत या पुलावरून जड वाहनांच्या रहदारीत खूप अशी वृद्धी झालेली नाही. विभागीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी केरळमध्ये एक पूल कोसळला होता. तेव्हापासून एनएचएआयने दर साल मान्सूनच्या आधी आणि नंतर पुलांच्या तपासणीचा नियम बनविला आहे. याच टेस्टिंग अंतर्गत मानकापूर उड्डाणपुलात मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात पुलाच्या एका बाजूने भेगा पडल्याचे दिसून आले होते. सळाखींनाही जंग लागल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
* डायव्हर्शन देऊन टाकली जात आहे नवी लेयर
मानकापूर उड्डाणपुलासोबतच फरसच्या आरओबीवरील पुलाच्या वरील लेयर काढून तेथे नवी लेयर टाकली जात आहे. पुलावर या कामासाठी जागोजागी डायव्हर्शन देण्यात आले आहे. यामुळे पुलावरून रहदारीसाठी समस्या निर्माण होत आहे. नव्या लेयरमुळे हा पूल शंभर वर्षापर्यंत मजबूत होऊन जाईल, असे सांगितले जात आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्याचा वेळ लागणार आहे.