नागपूर : महापालिकेच्या शाळा एकतर बंद पडत चालल्या आहेत आणि ज्या आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अशा अवस्थेमुळे विद्यार्थी व शिक्षकांना अप्रिय घटनांना सामाेरे जावे लागते. पश्चिम नागपूरच्या सुरेंद्रगढ परिसरातील हिंदी प्राथमिक शाळेत असाच प्रसंग घडला. शाळेच्या पहिल्या माळ्यावरील वर्गखाेलीची स्लॅब खाली काेसळली. सुदैवाने काेराेनामुळे शाळा बंद आहेत पण सुरू असती तर माेठा अनर्थ घडला असता.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रसंग घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शाळेची संपूर्ण इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. इमारत बांधकामात निष्कृष्ट साहित्य वापरल्याचे उघड झाले आहे. या इमारतीत वापरलेले लोखंड अत्यंत कमकुवत स्वरुपाचे आहे. सिमेंटच्या अत्यल्प वापरामुळे शाळेच्या बाहेरच्या बाजूचे प्लॅस्टर गळून पडले असून विटा दिसत आहेत. अनेक ठिकाणी झाडांची मुळे भितींत घुसल्यामुळे इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये इलेक्ट्रीक फिटिंग नाही. ज्या ठिकाणी आहे ते नादुरुस्त आहे. महानगरपालिकेने डागडूजीच्या नावावर केवळ रंगरंगोटी केली प्रत्यक्षात कुठलेही ठोस काम केले नाही. शाळेच्या स्थितीकडे पाहिल्यावर हाेणाऱ्या गाेष्टींचा अंदाज येताे. सध्या शाळा बंद आहेत. मात्र शाळा सुरू असती आणि वर्ग भरला असता तर काय झाले असते, याची कल्पना न केलेली बरी. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तळमजल्यावरील प्रसाधन गृहातही अशाच प्रकारची स्लॅब कोसळल्याचे आढळून आले आहे.
वारंवार तक्रारी करुनही नागपूर महानगरपालिकेने या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याचा आरोप जनहितचे संयोजक अभिजित झा यांनी केला आहे. प्रशासन व पदाधिकारी व स्थानिक नगरसेवकांच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप त्यांनी केला. या शाळेच्या नवनिर्मितीसाठी महानगरपालिकेने ५० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. पण अपघात घडल्यावर कामाला सुरुवात करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी मनपाच्या ७५ शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न दाखवले आहे, त्याचा शुभारंभ सुरेंद्रगढ शाळेतून करावा असे आवाहनही झा यांनी केले आहे.