नागपूर : सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्यांच्या मदतीशिवाय कारागृहाच्या आतून पळून जाणे शक्यच नाही. त्यामुळे कैदी पलायन प्रकरणात कारागृहातील कोण ‘भेदी‘ आहे, त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही तासात या प्रकरणातील काही दोषींचे निलंबन होण्याची शक्यता आहे.कारागृहातील बराकीची लोखंडी सळाक एका दिवसात कापणे शक्य नाही. मात्र, त्यांनी सळाक कापली आणि २२ फूट उंचीची भिंतही ओलांडली, त्यांना हे कसे शक्य झाले, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वांनाच पडला आहे. कारागृह उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी ब्लँकेट आणि शॉलची दोरी तयार करून कैदी पळून गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, सूत्रांनी कैद्यांना एक लांब वेळू पुरविण्यात आल्याची आणि या वेळूच्या आधारेच आरोपींनी २२ फूट उंचीची भिंत ओलांडल्याचा दावा केला आहे. पोलिसांना सहा तासानंतर माहितीघटना २ वाजता घडल्याची कारागृह सूत्रांची माहिती आहे. मात्र, या घटनेचा बोभाटा सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास झाला. सर्वप्रथम तुरुंगाधिकारी आर. जी. पारेकर यांना ही घटना कळली.त्यांनी कारागृहात धोक्याची घंटा वाजवली. वरिष्ठ तुरुंगाधिकारी आत्राम यांना तर आत्राम यांनी अधीक्षक वैभव कांबळेंना माहिती दिली. त्यामुळे सर्व वरिष्ठ तुरुंग अधिकारी कारागृहात आले. यावेळी ६.१६ वाजले होते. या सर्वांनी मात्र धंतोली पोलिसांना तब्बल ८ वाजता माहिती दिली. नंतर तक्रारीचे पत्र दिले. त्यानंतर धंतोली पोलीस आणि नंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारागृहात पोहचले. विलंब का ? नेहमीच लपवाछपवी करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांनी एवढी मोठी घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली असती तर गुन्हेगार शोधण्यास मदत झाली असती. गुन्हेगार पळून गेल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यासाठी कारागृह अधिकाऱ्यांनी चक्क ४ ते ६ तास विलंब का लावला, हा प्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही सतावत आहे. या विलंबाचा आणि पळून जाण्याच्या कटाचा काही संबंध आहे काय, हा सुद्धा प्रश्न वरिष्ठांना पडला आहे. दरम्यान, या आणि अशाच काही प्रश्नांचा शोध घेण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांचे पथक, मुंबई आणि पुण्यातून नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर, काही तासानंतर या प्रकरणात आणखी काही जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
कटात कुणाकुणाचा सहभाग
By admin | Published: April 01, 2015 2:32 AM