नागपुरातील उच्च न्यायालयात सोमवारपासून पक्षकारांना प्रवेशबंदी; कोरोनामुळे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 09:25 PM2022-01-06T21:25:02+5:302022-01-06T21:25:30+5:30
Nagpur News कोरोना व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून पक्षकारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी करण्यात आला.
नागपूर : कोरोना व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून पक्षकारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी करण्यात आला.
आदेशानुसार, उच्च न्यायालयात फिजिकल पद्धतीने कामकाज होईल, पण पक्षकारांना न्यायालयात प्रवेश करू दिला जाणार नाही. न्यायालयाने आदेश दिला असेल किंवा आधी परवानगी मिळविली असेल, अशाच पक्षकारांना न्यायालयात येऊ दिले जाईल. याशिवाय वकिलांसाठीही विविध बंधने लागू करण्यात आली आहेत.
वकिलांना त्यांचे दाखल प्रकरण सुनावणीसाठी आणण्याकरिता ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करावा लागेल. त्यासाठी त्यांना न्यायपीठासमक्ष जाता येणार नाही. नवीन प्रकरण आधी फिजिकली दाखल करावे लागेल व त्याला नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर प्रकरण ऑनलाईन अपलोड करावे लागेल. न्यायालयात वावरताना कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल. यासह न्यायालयीन कामकाजासंदर्भात अन्य विविध बाबी आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.