नागपूर : रायपूर येथील एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने आरोपी भागीदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर अन्य तीन आरोपींना जामीन मंजूर केला. राजेंद्रकुमार भीमराज जैन (४७), असे आरोपी भागीदाराचे नाव आहे. विकास रामचंद्र जैन, पंकज राजनकुमार जैन आणि विकास शिवकुमार सिंग सर्व रा. रायपूर, अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. आनंद मधुकर संगमनेरकर (४९), असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ते रायपूर येथीलच रहिवासी होते. त्यांनी नागपुरातील अग्रवाल लॉजमध्ये चिठ्ठी लिहून ३० नोव्हेंबर २०१४ रोजी नागपूर रेल्वेस्थानक येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याने आरोपींची नावे लिहून ठेवली होती. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. पुढे आनंद संगमनेरकर यांच्या पत्नी कल्याणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नागपूर रेल्वेस्थानक पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंविच्या ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण असे की, रायपूर येथील उषा रेकॉन सेंटर नावाच्या फर्ममध्ये आनंद संगमनेरकर आणि राजेंद्रकुमार जैन यांची भागीदारी होती. या फर्मचे संपूर्ण मालकी हक्क आपणाकडे यावे या हेतूने आरोपी राजेंद्रकुमार जैन हा अन्य सहकाऱ्याच्या मदतीने संगमनेरकर यांचा वेळोवेळी छळ करायचा, त्यांना अपमानित करायचा, चेकबुक आणि ड्रॉवरच्या चाव्याही त्यांनी हिसकावून घेतल्या होत्या. नवरात्रीच्या काळात दिवसभर कार्यालयात डांबूनही ठेवले होते. परिणामी या छळाला कंटाळून संगमनेरकर यांनी आत्महत्या केली होती. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे तर आरोपींच्या वतीने अॅड. जे. एम. गांधी यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद मदने हे आहेत. (प्रतिनिधी)
भागीदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: March 01, 2015 2:31 AM