पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:50 AM2019-03-09T10:50:41+5:302019-03-09T10:52:54+5:30

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली.

The party does not have an application even though discussions in Delhi | पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

Next
ठळक मुद्देशहर काँग्रेसकडे अर्ज करून अर्थ काय? इच्छुक उमेदवारांची नाराजी

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली. त्यामुळे शहर काँग्रेसकडे फक्त दिखाव्यासाठी अर्ज मागविण्यात आले का, असा सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी १६ जानेवारीपर्यंत शहर काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज सादर केले. २०१४ मध्ये लोकसभा लढलेल्या उमेदवाराला अर्ज करण्यातून सूट देण्यात आली होती. यावेळी मुत्तेमवार विरोधी गटाचे माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. बबनराव तायवाडे, माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत संबंधित अर्जांवर चर्चा झाली व शहर काँग्रेसने आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे १८ जानेवारी रोजी सादर केला. विशेष म्हणजे माजी खासदार नाना पटोले, शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी शहर काँग्रेसकडे अर्जही केला नव्हता. असे असताना दिल्लीत मात्र या तीन नेत्यांच्या दावेदारीवरच चर्चा करण्यात आली.
शहर काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेसकडे गेलेल्या अहवालात या तीनपैकी कुणाचे नाव होते का, अर्जच केला नव्हता तर नाव प्रदेशकडून केंद्रीय समितीकडे कसे गेले, दिल्लीतच थेट उमेदवार निश्चित करायचा होता तर स्थानिक पातळीवर अर्ज मागविण्याचे सोंग कशासाठी करण्यात आले, असे प्रश्न उपस्थित करीत इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर काँग्रेसकडे अर्ज न करताही उमेदवारी दिली जात असेल तर शहर काँग्रेसच्या अधिकारांवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

विधानसभेसाठी अर्जांचे सोंग करू नका
शहर काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागविल्यानंतरही अर्ज न करणाऱ्यांपैकी कुणालाही थेट दिल्लीतून तिकीट दिले जात असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शहर काँग्रेसकडे अर्ज मागविण्याचे सोंग करू नका. उगाच कुणाच्या भावनांशी खेळ करू नका. दिल्लीत बसूनच उमेदवार ठरवा, अशा संतप्त भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: The party does not have an application even though discussions in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.