नागपूर : राज्यातील सरकारविरोधात काही लोक खोट्या गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात विरोधी पक्षात काहीच दम नाही, त्यामुळे भाजपची लढाई ही विरोधकांशी नसून ‘नॅरेटिव्ह’शी आहे. विरोधकांचे खोटे दावे मोडून काढत सकारात्मक दृष्टिकोन समाजापर्यंत नेला पाहिजे. मात्र, ही लढाई कार्यकर्तेच लढताहेत, यात पदाधिकारी कधी सक्रिय होणार, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणिसांच्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यात २०-२० चे सरकार असून, अडीच वर्षांसाठीच कार्यकाळ राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे. उर्वरित कालावधीत मला सरकारकडून काय मिळेल, याची पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा करू नये. प्रसंगी त्यागाचीदेखील तयारी ठेवा, असे ते म्हणाले.
‘मिशन ५१ टक्के’ भाजपचे राज्यात सरकार असले तरी आत्मसंतुष्ट होऊन अतिआत्मविश्वास बाळगू नये. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्याच्या दृष्टीने संघटन बळकट करण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन सी. टी. रवी व बावनकुळे यांनी केले.
अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष ‘सोशल मीडिया’त ‘फेल’ यावेळी फडणवीस यांनी भाजपतर्फे राज्यपातळीवर घेण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ सर्वेक्षणावरून जिल्हाध्यक्षांना परखड बोल सुनावले. केवळ ९ जिल्हाध्यक्षांचे ‘सोशल मीडिया’वरील काम उत्तम आहे, तर पाचजणांचे काम सरासरी पातळीचे आहे. १५ जणांचे तर ‘सोशल मीडिया’वर अस्तित्वच नाही. अनेक आमदारांचीदेखील अशीच स्थिती आहे. प्रत्येकाने ‘सोशल मीडिया’वर व्यक्त झाले पाहिजे व पक्षाची भूमिका सातत्याने मांडली पाहिजे, असे ते म्हणाले.