नागपूर : इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची विमानात एका वयस्क प्रवाशाचा रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे मृत्यू झाला. देवानंद तिवारी असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते रांचीचे रहिवासी होते. या विमानाचे सोमवारी रात्री ७.४० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘मेडिकल इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आले.
मुंबई-रांची विमानाने सायंकाळी ६.१९ वाजता १६४ प्रवासी आणि सहा क्रू मेंबरसह उड्डाण भरले. हे विमान रात्री ८.१० वाजता रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचणार होते. विमानात देवानंद तिवारी यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता. देवानंद तिवारी मुंबईत काम करीत होते. प्रवाशादरम्यान त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या आणि लगेचच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना किडनीचा आजार होता आणि टीबी आजाराने ग्रस्त होते.
विमान नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर सुमारे ४० मिनिटे थांबले आणि रात्री ८.४० वाजता रांचीकडे रवाना झाले. लँडिंगनंतर तिवारी यांना किम्स किंग्सवे हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.