नागपूर : आतापर्यंत सर्वाधिक प्रवासी संख्या ९१ हजार असलेल्या मेट्रो रेल्वेतून लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी जवळपास १.१० लाख नागरिकांनी प्रवास केला. लोकांची मेट्रो रेल्वेतून प्रवासाची आवड वाढल्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. मेट्रोचा कामठी मार्ग आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्ग सुरू झाल्याचा सकारात्मक परिणाम आहे. रविवारी जवळपास ८० हजार प्रवासी संख्येची नोंद झाली.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता कामठी रोड आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली. ही सेवा सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दर १५ मिनिटांनी सुरू आहे.
मेट्रोच्या कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सुरू होण्याची नागरिकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. लोकार्पणानंतर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला झाला. सोमवारी सकाळीपासून या दोन्ही नवीन मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. काही वर्षांआधी पाठ फिरविलेल्या प्रवाशांना आता मेट्रो रेल्वे आवडीची ठरू लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता महामेट्रोने विविध स्टेशनवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले होते. सोमवार सकाळीपासून कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक या कामठी मार्गावर आणि प्रजापतीनगर ते सीताबर्डी इंटरचेंज अर्थात सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. आता मेट्रो शहराच्या चारही बाजूने सुरू झाल्याने ही आकडेवारी दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिनांक - प्रवासी संख्या
- १५ ऑगस्ट - ९१ हजार ३९१
- ५ ऑक्टोबर - ८३ हजार ८७६
- १४ नोव्हेंबर - ८२ हजार ९२५
- २३ सप्टेंबर - ८० हजार ८१४
- २३ नोव्हेंबर - ७९ हजार ८९५
- १२ डिसेंबर - १.१० लाख