नागपूर : अधिक वेगाने पसरणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून विदेशातून नागपुरात परतलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे. त्यानुसार आयरलँड येथून आलेल्या एका प्रवाशाचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णाला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात असून रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रामक असल्याचे म्हटले जाते. मात्र, या नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूची लागण झालेली एकही व्यक्ती सध्यातरी भारतात आढळलेला नाही. तरीही उपाययोजना म्हणून २५ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप, मिडल ईस्ट, साऊथ आफ्रिका येथून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. ज्यांना लक्षणे आहेत त्यांनी स्वत:हून चाचणी करण्याचे आवाहनही केले जात आहे. त्यानुसार आयरलँडहून नागपुरात परतलेल्या ३६ वर्षीय प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे. प्राप्त माहितीनुसार, हा रुग्ण २५ नोव्हेंबर रोजी आयरलँडहून दिल्लीत पोहचला. त्याच दिवशी रायपूर येथे लग्न सोहळ्यासाठी गेला. तेथून १४ डिसेंबर रोजी नागपुरात परतला. मागील काही दिवसांपासून लक्षणे आढळून आल्याने २६ डिसेंबर रोजी खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली असता आज अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नव्या स्ट्रेनची चाचणी करण्यासाठी सोमवारी पुण्याच्या प्रयोगशाळेत नमुने पाठविले जाणार आहे. सध्या मेडिकलमध्ये विदेशातून आलेले तीन पुरुष आणि दोन महिला उपचाराखाली आहेत.
-पुन्हा चार प्रवासी परतले बाधित विदेशातून
कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेल्या विदेशातून नागपुरात परतलेल्या आणखी चार प्रवाशांना रविवारी व्हीएनआयटी येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले. आतापर्यंत क्वारंटाईन झालेल्या प्रवाशांची संख्या आठ झाली आहे. दाखल झाल्यापासून पाच ते सात दिवसांच्या दरम्यान त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. सोबतच पुण्याच्या प्रयोगशाळेत नमुने पाठविले जाणार आहे. आतापर्यंत ३८ प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे.