लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.यापूर्वी केवळ ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू होती. आता अॅक्वा लाईनवरदेखील सीताबर्डी स्टेशन येथून सकाळी ८ ते सायंकाळी ८.३० पर्यंत लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व नियोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. अॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मिळून दररोज २०० मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या होणार आहे.अॅक्वा लाईन या ११.५ किमी लांबीच्या मार्गिकेवर सहा मेट्रो स्टेशन लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या मार्गिकेवर प्रवासी दरही कमी आहे. या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात असलेल्या शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सेवा अतिशय फायद्याची ठरत आहे. शिवाय या भागातील औद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या अनेक छोट्यामोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी मेट्रो सेवा फायद्याची ठरणार आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होत आहे. या मार्गावर अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.
अॅक्वा लाईनवर आता दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:09 AM
अॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.
ठळक मुद्देमेट्रो फेऱ्यामध्ये आजपासून वाढ : ऑरेंज व अॅक्वा लाईनवर २०० फेऱ्या