नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा प्रशासनाचा आदेश आहे. तर परराज्यातील रेल्वे प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग रेल्वेच्या वतीने करण्यात येणार आहे.
नागपुरात १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एसटी महामंडळाला ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार एका बसमध्ये २२ प्रवासी बसविण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात शारीरिक अंतर राखण्यासाठी एका सीटवर एकच प्रवासी बसविण्यात येणार आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रत्येक बस सॅनिटाईझज करून आगाराच्या बाहेर काढण्यात येणार आहे. तर रेल्वेस्थानकावरून इतर शहरात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. तर दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, केरळ येथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी त्यांच्या जवळचे असलेले तिकीटच पास समजण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
..........
एका सीटवर एकच प्रवासी
प्रशासनाकडून आलेल्या आदेशानुसार एसटीच्या बसेस ५० टक्के आसन क्षमतेने चालविण्यात येणार आहेत. एका बसमध्ये २२ प्रवासी बसविण्यात येणार असून, एका सीटवर एकच प्रवासी राहील. प्रत्येक बस सॅनिटाईझ करून प्रवासासाठी रवाना करण्यात येईल.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
प्रवाशाचे तिकीटच समजला जाईल पास
रेल्वेस्थानकावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी त्यांच्या जवळ असलेले तिकीटच पास म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
- एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
.............