आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह महाराष्ट्र व देशभरात काेराेनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. दरराेज लाखाे रुग्ण मिळत आहेत. याच कारणाने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही संक्रमणाचा धाेका लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रेल्वेचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. विशेषत: गाेवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड व केरळ राज्यातून येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र या राज्यांतून आरटीपीसीआर टेस्ट न करताच प्रवासी नागपुरात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे असताना नागपूर स्टेशनवर अशा प्रवाशांबाबत हयगय करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर स्टेशनवर संबंधित सहा राज्यांतून आलेल्या प्रवाशांमधून, ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट (निगेटिव्ह) आहे, त्यांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारून घरी पाठविले जात आहे. ज्यांचे तापमान अधिक आहे किंवा ज्यांच्यात काेराेनाची लक्षणे दिसून येत आहेत, त्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. नागपूर महापालिकेचे सहायक आराेग्य अधिकारी डाॅ. विजय जाेशी यांनी सांगितले, नागपूर स्टेशनवर संशयित प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करताना आतापर्यंत ५ प्रवासी काेराेना संक्रमित आढळून आले आहेत. त्या सर्वांना पाचपावली काेराेना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. मात्र यावरून एक गाेष्ट लक्षात येते की, पूर्ण प्रवासादरम्यान या पाॅझिटिव्ह लाेकांनी आणखी किती प्रवाशांना संक्रमित केले असेल? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही बाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेल? असतानाही आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्याच्या निर्देशाचे कठाेरतेने पालन हाेत नसल्याने स्थिती नियंत्रणात येण्याऐवजी आणखी बिघडण्याची भीती बळावली आहे.
प्रवासाच्या ७२ तासापूर्वी केलेला रिपाेर्ट मान्य
दरम्यान, मध्य रेल्वे, नागपूर मंडलाचे वरिष्ठ प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी, रेल्वे प्रवासाच्या ७२ तासांपूर्वी केलेली आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट रेल्वेत प्रवास करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. संबंधित सहा राज्यांतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून आरटीपीसीआर रिपाेर्ट मागण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाेर्ट नसलेल्या प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येते. नागपूर स्टेशनवर येणाऱ्या सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करून हाेम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येतात. संशयित प्रवाशांची रॅपिड टेस्ट करून पाॅझिटिव्ह येणाऱ्या प्रवाशांना मनपाच्या टीमच्या मदतीने क्वारंटाईन सेंटरवर पाठविण्यात येत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
हातावर हाेम क्वारंटाईनचा शिक्का
रेल्वे स्टेशनवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर हाेम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात येत आहे. पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात शाईने लावण्यात येणाऱ्या शिक्क्यामुळे त्वचेची समस्या निर्माण हाेत हाेती. स्टॅम्पच्या ठिकाणी जखम हाेत असल्याच्या तक्रारी मिळत हाेत्या. त्यामुळे काही दिवसांनंतर स्टॅम्प लावणे बंद झाले. आता पुन्हा रेल्वे स्टेशनवर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप तरी कोणाला जखम झाल्याची तक्रार समाेर आलेली नाही.