वारंवार चेनपुलिंग : कोचची सफाई करण्याची मागणी नागपूर : रेल्वे प्रशासन स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवित असताना अहल्यानगरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी वारंवार कोचची सफाई करण्याची मागणी करूनही सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे या गाडीतील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर कोचची सफाई करण्याच्या मागणीसाठी वारंवार चेनपुलींग केले. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडी क्रमांक २२६४६ त्रिवेंद्रम-इंदोर अहल्यानगरी एक्स्प्रेस सायंकाळी ५ च्या सुमारास आली. या गाडीतील एस ७ कोचमधील प्रवाशांनी विजयवाडा रेल्वेस्थानक आणि त्यानंतर बल्लारशा रेल्वेस्थानकावर कोचमध्ये पाणी उपलब्ध करून कोचची सफाई करण्याची मागणी केली. परंतु दोन्ही ठिकाणी त्यांना पाणी आणि सफाईची व्यवस्था करून देण्यात आली नाही. नागपुरात गाडी आल्यानंतर त्यांच्या कोचमध्ये पाणी पुरविण्यात आले. परंतु कोचची सफाई न केल्यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले. त्यांनी सफाईच्या मागणीसाठी या गाडीची सातवेळा चेनपुलींग करून गाडी रोखून धरली. यामुळे या गाडीला जवळपास ३० मिनिटांचा विलंब झाला. रेल्वे प्रशासनाने मागणी करूनही सफाई न करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. (प्रतिनिधी)
अहल्यानगरी एक्स्प्रेसमधील प्रवाशी संतापले
By admin | Published: December 26, 2016 2:40 AM