नागपूर : गणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावर येणारे प्रवासी वाहतूक नियंत्रकच खासगी वाहतूकदाराच्या एजंटला विकत असल्याची गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने विभाग नियंत्रकांकडे केली आहे. या प्रकाराने महामंडळाला आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
गणेशपेठ बसस्थानकावरून प्रवाशांची पळवापळवी नित्याचीच बाब झाली आहे. गर्दीच्या वेळी खासगी वाहतूकदारांचे एजंट बसस्थानकावर येतात. बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना हेरतात. तातडीने बस सोडली जात असून कमी दरात सीट उपलब्ध असल्याचे सांगतात. बसची वाट बघून कंटाळलेले प्रवासी सहजतेने खासगी बसमध्ये जाऊन बसतात. या प्रकाराने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांच्या पळवापळवीत एसटी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे आरोपही अनेकदा झाले. पण, एजंटला ओळखणे आणि त्यांना प्रवासी व बसस्थानकापासून लांब ठेवणे अशक्य असल्याचे सांगून प्रशासनाकडून पाठराखण केली गेली. आता एसटी कामगारांची संघटना असलेल्या कामगार सेनेनेच बसस्थानकावरून प्रवाशांच्या विक्रीचा आरोप केला आहे. एसटीचा एक वाहतूक नियंत्रकच एजंटला मदत करीत आहे. तोच फोनवरून विशिष्ट मार्गावरील प्रवासी असल्याची माहिती एजंटपर्यंत पुरवतो. त्यानंतर एजंट येऊन प्रवाशांचे मन वळवून सोबत घेऊन जातो. यात संबंधिताचे कमिशन ठरलेले असल्याचे कामगार सेनेचे म्हणणे आहे. एसटीच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शनिवारी पुढील आठवड्यासाठी वाहतुक नियंत्रकाची ड्युटी लावण्यात यावी आणि याची माहिती विभाग नियंत्रकाकडे सादर करणे अपेक्षित आहे. परंतु या निर्देशाचे पालन करण्यात येत नाही. वाहतुक नियंत्रकाची एकाच ठिकाणी नियुक्ती केली जात असल्यामुळे त्यांचे खासगी एजंटशी लागेबांधे तयार होऊन देवाणघेवाण सुरू होत असल्याचा आरोप कामगार सेनेने केला आहे.
...........