लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अगोदरच तोट्यात सुरू असलेली महापालिकेची आपली बस आणखी तोट्यात जाण्याच्या भीतीने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याला प्रशासन व पदाधिकारी चालढकल करीत आहे. परिणामी नागरिकांना ऑटो वा टॅक्सीसाठी जादा पैसे मोजण्यासाठी बाध्य करून वेठीस धरले जात आहे.
कोरोनापूर्वी आपली बसला महिन्याला ६ कोटींपर्यंत तोटा सहन करावा लागत होता. पूर्ण बस सुरू केल्यास यात ९ कोटीपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उपक्रमाची चिंता वाढली आहे.
कोरोनापूर्वी शहरात विविध मार्गावर ३६० ते ३६५ बसमधून दररोज दीड लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या १५८ बस ५८ मार्गावर धावत असून २० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. पूर्ण ३६५ बस सुरू केल्या तरी करोना संसर्गाची शक्यता असल्याने शारीरिक अंतरासाठी ५० टक्केच प्रवासी वाहतूक करता येत असल्याने दररोज ५० हजार प्रवासी प्रवास करतील. परिणामी महिन्याचा तोटा ३ कोटींनी वाढणार असल्याने सर्व बस सुरू करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे परिवहन सभापती बाल्या बोरकर दोन महिन्यापासून मनपाकडे फिरकलेले नाही.
तर महिन्याला ९ कोटी तोटा
करोनापूर्वी दर महिन्याला ६ कोटी उत्पन्न तर १३ कोटी खर्च होता. दर महिन्याला ७ कोटीचा तोटा होत होता. सर्व बस सुरू केल्यास उत्पन्न ४ कोटी होईल. मात्र खर्च कायम राहील तोटा वाढणार असल्याने पूर्ण क्षमतेने ३६५ बस सुरू करण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी उदासीन दिसत आहे.
एकूण बस - ३६५
सुरू असलेल्या बस - १५८
टाळेबंदीपूर्वी मासिक उत्पन्न - ६ कोटी
- मासिक खर्च -१३ कोटी
- मासिक तोटा -७ कोटी
- सध्याचे मासिक उत्पन्न. -. १.२० कोटी
- ३६५ बस सुरू केल्यास उत्पन्न ४ कोटी तर
संभाव्य तोटा ९ कोटी
कोरोना संसर्ग बघून निर्णय
पूर्ण बसेस सुरू करण्याबाबतचा निर्णय शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती बघून डिसेंबरमध्ये घेतला जाईल.
रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, परिवहन विभाग मनपा