नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कोविड दरम्यान विविध सोयी सवलती बंद करून रेल्वे तिकिटाच्या दरात मोठी वाढ करणाऱ्या भारतीय रेल्वेने अखेर प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाढलेल्या तिकिट दरात कपात करून कोरोनापूर्वी ज्या प्रमाणे तिकिट दर होते त्याच प्रमाणे आता वाढलेले तिकिट दर खाली आणण्याचे ठरवले आहे.
भारतीय रेल्वेने कोविड दरम्यान अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांच्या तिकिट दरात मोठी वाढ केली होती. गर्दी कमी करून कोरोना नियंत्रित करण्याचा हेतू त्यामागे असल्याचे सांगितले जात होते. लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर वाढलेल्या या तिकिट दराबाबत मोठी ओरड होत आहे. रेल्वे मंत्रालय आणि ठिकठिकाणच्या रेल्वे अधिकाऱ्यांकडेही या संबंधाने देशभरातील प्रवाशांनी नाराजी नोंदवून वाढलेले तिकिट दर करण्याची मागणी केली होती. दोन वर्षांपासून सातत्याने ही मागणी रेटली जात असली तरी त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते. मात्र, आता रेल्वेच्या नव्या नेटवर्कचा अन् विकासाचा मार्ग प्रशस्त केला जात आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर, रेल्वे मार्गावर विकास काम केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, कोरोना काळात वाढविण्यात आलेल्या रेल्वे तिकिट दरातही कपात करण्याचे ठरल्याचे समजते.
लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आलेल्या अनेक पॅसेंजर रेल्वे गाड्यांची कॅटेगिरी ठरवून एक्सप्रेस ट्रेनच्या किरायासोबत त्यांची सांगड घातली होती. अर्थात प्रवाशांना पॅसेंजर ट्रेनमध्ये बसूनही एक्सप्रेसचा किराया द्यावा लागत होता. आता मात्र पॅसेंजरचे तिकिट भाडे पुर्वीप्रमाणेच करण्यात आले आहे. या संबंधाने अनारक्षित तिकिट सिस्टम अॅपमध्येही तिकिट दराच्या नव्या बदलाची नोंद करण्यात येणार आहे.
'त्यांना' होणार सर्वाधिक फायदा
सर्व मेमू ट्रेन आणि शून्यापासून सुरू होणाऱ्या क्रमांकाच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिट दरात नव्या निर्णयानुसार सुमारे ५० टक्के तिकिट दर कमी होणार आहे. विशेष म्हणजे, तिकिट दर कमी करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.