लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वर्ल्ड क्लासच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर मोजक्याच प्लॅटफार्मवर जनता खाना, खाद्यपदार्थ आणि जेवण मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. इतर प्लॅटफार्मवरील प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करण्याची पाळी येत असून उर्वरीत प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.रेल्वेस्थानकावर खान-पानाची सुविधा डिसेंबर २०१७ पर्यंत रेल्वेकडे होती. त्यानंतर ही सेवा ‘आयआरसीटीसी’ कडे सोपविण्यात आली. आधी जनआहार त्यापाठोपाठ बेस किचनचे खासगीकरण झाले. मात्र, आयआरसीटीसी आणि पेंट्रीकार संचालकांच्या वादात अद्यापही बेस किचन सुरु झाले नाही. डिसेंबर २०१७ पर्यंत प्रत्येक प्लॅटफार्मवर रेल्वेचे स्टॉल होते. या स्टॉलवरुन खाद्यपदार्थासह शितपेय, बिस्किट आदींची विक्री व्हायची. शिवाय बेस किचनकडून नास्ता विकणारी एक ट्राली प्लॅटफार्मवर फिरत असे. या ट्रालीच्या माध्यमातून इडली, सांबारवडा आणि जनता खाना ची विक्री नाममात्र १५ रुपये दरात होत होती. परंतु आता प्रवाशांना स्वस्त दरात मिळणारा जनता खाना बंद होऊन नास्तासुध्दा मिळत नाही. प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर तीन तर ४/५ वर एकच स्टॉल आहे. एका गाडीतील हजारो प्रवाशांसाठी केवळ एक स्टॉल असल्यामुळे आणि गाडी फक्त १० ते १५ मिनिटेच थांबत असल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ विकत घेणे तारेवरची कसरत ठरत आहे. याशिवाय होम प्लॅटफार्मवर एक आणि प्लॅटफार्म क्रमांक ६/७ वर एकही स्टॉल नसल्यामुळे या प्लॅटफार्मवरील प्रवाशांनी खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी जायचे कोठे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने खानपानाच्या व्यवस्थेचे खाजगीकरण करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु ही व्यवस्था न केल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असून प्रवाशांच्या या अडचणीकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.जनता खाना सुरु करण्याची गरजप्रवाशांना स्वस्त दरात जनता खाना पुरविण्याची सेवा अचानक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गरिब प्रवाशांच्या हितास्तव रेल्वे प्रशासनाने ही सेवा सर्व प्लॅटफार्मवर उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’- प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूमरेल्वेइतर प्लॅटफार्मवरही खाद्यपदार्थ मिळणे आवश्यक‘रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वरच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. परंतु इतर प्लॅटफार्मवरील प्रवाशांना भोजन विकत घेण्यासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वच प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’-सूरज खापर्डे, प्रवासी