नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता आणखी तीन राज्यातील हवाई प्रवाशांकरिता राज्य शासनाने आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्य शासनाने केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली व एनसीआर आणि राजस्थान राज्यातील प्रवाशांना टेस्ट रिपोर्ट अनिवार्य केले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशात ग्रामपंचायत निवडणुका आणि उत्तराखंडमध्ये कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता लक्षात घेता राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी आदेश जारी करून या राज्यातील हवाई प्रवाशांना रिपोर्ट अनिवार्य करताना आदेश जारी केले आहेत. आदेशात ‘सेन्सिटिव्ह ओरिजीन’ असे लिहिले आहे. सध्या नागपुरातून उत्तरप्रदेशातील प्रयागराज आणि पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून थेट उड्डाणे नाहीत. येथील प्रवासी दिल्ली, मुंबई आणि पुणे मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक आहे.रिपोर्ट नसल्यास प्रवाशांना नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. अशा प्रवाशांना गृहविलगीकरणात पाठविण्यात येणार आहे.