नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी दिल्ली जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना सकाळपासून सायंकाळपर्यंत विमानतळावरच प्रतीक्षा करावी लागली. एअर इंडियाच्या एआय-४६९ विमानात दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही वेळ प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. अखेर दिल्लीहून दुसरे विमान बोलवून सायंकाळी ५ वाजता प्रवाशांना रवाना करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-४६९ नागपूर-दिल्ली विमान रायपूर मार्गे जाते. हे विमान सकाळी ८.१० वाजता उड्डाण भरतेवेळी तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांना खाली उतरविले. दुरुस्तीनंतर प्रवाशांना पुन्हा विमानात बसविण्यात आले. त्यानंतर पुन्हा बिघाड आल्याने प्रवाशांना दुसऱ्यांदा उतरविण्यात आले. अखेर दिल्लीहून दुसरे विमान बोलविण्यात आले. सकाळी दिल्लीला जाणाऱ्या विमानात १८० प्रवासी होते. सायंकाळपर्यंत ही संख्या १०६ पर्यंत कमी झाली.
दोनदा वळविण्यात आले पुणेहून येणारे विमान
इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ६१०९ पुणे-नागपूर विमानाला हैदराबादला वळविण्यात आले. काही कारणांनी या विमानाला हैदराबादहून रायपूरला नेण्यात आले. त्यानंतर विमान नागपुरात पोहोचले. याशिवाय गुरुवारी गो-फर्स्टचे जी८ २६०१-८८१ मुंबई-नागपूर-पुणे विमान रद्द करण्यात आले.