नागपूर : ज्या गावाला जायचे ती बस स्थानकात येण्यासाठी किती वेळ आहे, सध्या ती कुठे आहे, ते आता सहजपणे कळणार आहे. एसटी महामंडळाने सर्व बस आगारात डिस्प्ले बोर्डवर बसेसचे लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन केले आहेत. त्यामुळे कुणीही बस आगारात जाऊन पाहिजे त्या बसचा टाईम टेबल पाहू शकतो. तांत्रिक अडचणीवर मात केल्यानंतर लवकरच प्रवाशांना ही सुविधा मोबाइल ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.
ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाची बस कधी येणार याची चाैकशी बसस्थानकातील कक्षात जाऊन वारंवार अनेक प्रवासी करतात. संबंधित अधिकारी लवकरच येईल, असे उत्तर देतो. मात्र, सध्या ती बस कुठल्या मार्गावर, कुठे आहे, तिला स्थानकात पोहचण्यासाठी किती वेळ लागेल, हे कुणी सांगत नाही. परिणामी प्रवाशांना नाहक ताटकळावे लागते. ते लक्षात घेत एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी
बसेसला ट्रॅकिंग सिस्टिमने कनेक्ट केले होते. प्रत्येक आगारात लावलेल्या डिस्प्ले बोर्डवर ती बस कुठे आहे, ते कळावे यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली होती. ज्या प्रमाणे रेल्वेगाडीला उशीर झाला तर संबंधित प्रवाशाच्या मोबाइलवर तसा मेसेज मिळतो. त्याचप्रमाणे एसटीच्या प्रवाशांनाही ही सुविधा मिळावी, असा त्यामागचा हेतू होता. या यंत्रणेचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले आहे.
सूचना आणि तक्रारीचेही ऑप्शन
एसटीचे ॲप कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासी त्यामाध्यमातून एसटीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकतील आणि तक्रारीही करू शकतील. तांत्रिक अडचणीवर मात केल्यानंतर ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.