लाेकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : राज्य शासनाने पाेषण आहार वाटपात पारदर्शकता यावी म्हणून पाेषण माेबाईल ट्रॅकर प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीत काम करताना माेबाईल ॲप कसे हाताळायचे, याबाबत काटाेल येथे नुकतेच प्रशिक्षण कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. या कार्यशाळेत काटाेल येथील पाच केंद्रांतर्गत येणाऱ्या १९४ अंगणवाडीसेविका सहभागी झाल्या हाेत्या.
केंद्र शासनाच्या पोषण अभियानामुळे हे बदल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यासाठी अंगणवाडीसेविकांना शासनामार्फत मोबाईल हॅण्डसेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोषण अभियान राबविण्यासाठी पोषण ट्रॅकर मोबाईल ॲपचा उपयोग गरजेचे असल्याने काटाेल तालुक्यातील कोंढाळी, कचारीसावंगा, येनवा, ढवळापूर व पारडसिंगा या पाच केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या १९४ अंगणवाडीसेविकांना १८ ते २५ जून या काळात प्रशिक्षण देण्यात आले. यात जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटील, नितीन काळे, तुषार रेवतकर व नयना नागमोते यांनी अंगणवाडीसेविकांना या ॲपबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. ॲप हाताळताना येणाऱ्या समस्याही अंगणवाडीसेविकांनी मांडल्या. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत त्यांचे समाधान करण्यात आले.