दोन महिन्यात फक्त २,२३४ खड्डे बुजवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळा सुरू होताच महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा फुगा फुटला आहे. चेंबरसोबतच पावसाळी नाल्याची सफाई झालेली नाही. त्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी इन्स्टा रोड पॅचर मशीनची निविदा काढणार आहे. १.९९ कोटीची ही निविदा आहे. याचा विचार करता भरपावसात खड्डे बुजवले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याचा विचार करता आधीच ही प्रक्रीया पूर्ण करणे अपेक्षित होते.
मनपाच्या हॉटमिक्स विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल व मे महिन्यात २,२३४ खड्डे बुजवण्यात आले. वास्तविक वर्ष २०२०-२१ मध्ये शहरातील ६,१२५ खड्डे बुजवण्यात आले होते. तसेही पावसाळ्याच्या दिवसात खड्डे बुजवण्याचे काम बंद असते. गेल्या दोन महिन्यात बुजवलेल्या खड्ड्यांचा विचार करता ते नगण्य आहे.
मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत इन्स्टा रोड पॅचर मशीनच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचा प्रस्ताव आणला जाणार आहे. याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. परंतु मुळात या प्रस्तावाला विलंब झाला आहे. त्यामुळे आता मंजुरी मिळाली तरी यातून काहीही साध्य होणार नाही.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. यासाठी उच्च न्यायालयाने फटकारले होते. तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली होती. त्यानंतरही वर्षभरात मनपाने कोविडच्या नावाखाली शहरातील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केले.
मनपातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मोबाईल कनेक्शनवरील खर्चासाठी ५० लाखाच्या निधीला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला जात आहे. तसेच १२ उद्यानालगतच्या नाल्यावर एसटीपी लावण्याबाबतची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे.