बिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काही महिला बचत गटाच्या सदस्यांनी गटाच्या माध्यमातून मायक्राे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची रक्कमही ५० ते ७५ हजार रुपयांच्या घरात आहे. कर्जदार महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती आधीच बेताची असून, काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून छाेटे उद्याेगधंदे बंद असल्यागत आहेत. त्यातच या मायक्राे फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करीत महिलांच्या मागे कर्ज परतफेडीचा तगादा लावला आहे.
काेंढाळी (ता. काटाेल) परिसरातील प्रत्येक गावात महिलांचे बचत गट असून, त्या गटांनी राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांसाेबतच मायक्राे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जाच्या रकमेतून त्यांनी बॅण्डपार्टी, सलून, पानटपरी यासह अन्य छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. वर्षभरापासून काेराेना संक्रमणामुळे हे सर्व व्यवसाय बंद असल्याने उत्पन्नही थांबले आहे. त्यामुळे या कर्जाचे हप्ते भरण्यास दिरंगाई हाेत आहे. पहिल्या लाॅकडाऊन काळात शासनाने कर्जवसुलीला स्थगिती दिल्याने या कर्जदार महिलांनाही दिलासा मिळाला हाेता.
दुसऱ्या लाॅकडाऊन काळात छाेटे उद्याेग बंद असले तरी कर्जवसुलीला शासनाने स्थगिती दिली नाही. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींत वाढ झाल्याने कर्जदार महिलांकडे असलेली बचतही त्यात खर्च हाेऊ लागली. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमाेर उभा ठाकला. काेंढाळी येथील उड्डाणपुलाखाली चहा, नाश्ता टपरी चालविणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या पत्नीने मायक्राे फायनान्स कंपनीकडून ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. लाॅकडाऊनमुळे धंदा बंद आहे. त्यातच कर्जाची परतफेड करण्यासाठी मायक्राे फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बचत गटाचे अन्य सदस्य तगादा लावत आहेत. जवळ पैसा नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आल्याची भावनाही त्या व्यक्तीने व्यक्त केली. प्रशासनाने यात हस्तक्षेप करून कर्जवसुलीला काही काळ स्थगिती द्यावी, अशी मागणीही महिला बचत गटाच्या सदस्यांनी केली आहे.
....
अनेकांकडे कर्ज थकीत
काेंढाळी परिसरातील बहुतांश महिला बचत गटांनी विविध मायक्राे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. एका गटाने दाेन ते तीन मायक्राे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले. या कर्जांचे हप्ते आठवडा, पंधरवडा व महिनाभरात भरावे लागतात. उद्याेग-धंदे बंद असल्याने अनेकांना हप्ते भरणे शक्य हाेत नाही. त्या प्रत्येकाकडे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. एका महिला सदस्याने जर कर्जाची रक्कम भरली नाही तर मायक्राे फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी ती रक्कम गटाच्या इतर सदस्यांकडून वसूल करतात, असेही काहींनी सांगितले.
...
आमच्या शाखेत ७० महिला बचत गटांची खाती आहेत. यातील बहुतेक बचत गटांनी कर्जाची उचल केली असून, त्या रकमेतून त्यांनी उद्याेग-धंदे सुरू केले आहेत. लाॅकडाऊनमुळे सर्वांनाच फटका बसला आहे. आम्हालाही त्या कर्जदारांकडून हप्ते वसूल करावयाचे आहेत. मात्र, आम्ही सक्तीची कर्जवसुली करीत नाही.
साैमित्र डे, शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ इंडिया, काेंढाळी.