वि.स. जोग : महाकवी सुधाकर गायधनींच्या ‘योगिनींच्या स्वप्न सावल्या’चे प्रकाशन नागपूर : स्त्रीमनाचे अंतरंग उलगडणारे, सक्तीने लादलेले ब्रह्मचर्य कसे विकृतीकडे वळते, अशा विषयांवर हात घालत स्त्रीमन जपणाऱ्या ‘योगिनींच्या स्वप्न सावल्या’ या महाकाव्यातून संयम आणि चारित्राचा संदेश महाकवी सुधाकर गायधनी यांनी दिला असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. वि.स. जोग यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने महाकवी सुधाकर गायधनी यांचे दुसरे महाकाव्य ‘योगिनींच्या स्वप्न सावल्या’या काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा सोमवारी बाबुराव धनवटे सभागृहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. वि.स. जोग, अध्यक्ष टी.एम. करडे, वक्ते दा.गो. काळे, संजय बोरुडे, रमेश बोरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी योगिनींच्या स्वप्न सावल्यांचा उल्लेख करीत जोग म्हणाले की, सुधाकर गायधनी यांनी हे साहित्य रचून खूप मोठे उड्डाण घेतले आहे. दोन महाकाव्य रचून त्यांनी गाठलेली उंची महाराष्ट्रात कोणताही साहित्यिक गाठू शकत नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही महाकाव्य रचले गेले, परंतु ते घटनेवर आधारित होते. परंतु गायधनींनी हे महाकाव्य रचून अभिजात भाषेचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. बोलीभाषेतील कविता लिहिणारा हा कवी मासेस बरोबरच क्लासेससचासुद्धा आहे. हे महाकाव्य म्हणजे काश्मीरच्या गालिचाचा समूह आहे. याप्रसंगी संजय बोरुडे म्हणाले की, हे महाकाव्य अभिजात संवेदनशीलता प्रदान करणारे आहे. आकाशव्यापी आवाका असलेले महाकाव्य आजच्या सैराट झालेल्या पिढीला वास्तव्यात आणणारे आहे. भोग, कर्म आणि मोक्ष याचे तत्त्वज्ञान सांगणारे हे महाकाव्य आहे. कवीने नव्या सांस्कृतिक संचेताचा दस्ता आम्हाला प्रदान केल्याच्या भावना बोरुडे यांनी व्यक्त केल्या. स्त्रीजाणिवेचे अंतर्सूत्र या साहित्यातून जागृत झाल्याचे दा.गो. क ाळे म्हणाले. याप्रसंगी महाकवी सुधाकर गायधनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, अलंकार आणि आभूषणाने परिधान के लेली कोणतीही कलाकृती उत्कृष्ट ठरत नाही. कवितासुद्धा त्यातीलच एक आहे. त्यामुळे रसिकांनी ती अनुभवल्यासच त्याची महती कळते. अतिशिष्ट कलावंत हा रसिकांसाठी कधीच सहृदयी ठरू शकत नसल्याचे गायधनी म्हणाले. (प्रतिनिधी)
महाकाव्यातून संयम, चारित्र्याचा संदेश
By admin | Published: March 28, 2017 1:58 AM