नागपूर : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मेयो, मेडिकलसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय व कामगार विमा रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी गुरुवारी संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. जवळपास १५०वर नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. रुग्णांच्या तुलनेत मोजक्याच परिचारिका व कर्मचारी असल्याने केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा सुरु होत्या.
महाराष्ट्र गर्व्हमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशन व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने गुरुवारी मेयो, मेडिकलल व डागामधील परिचारिकांनी रुग्णालयाच्या परिसरात नारे-निदर्शने केली. संपाचा पहिला दिवस असल्याने काही परिचारिका व कर्मचारी संपात सहभागी झाले नव्हते. आज त्यांच्याच भरोवशावर रुग्णसेवा सुरू होती. परंतु संप कायम राहिल्यास या तिन्ही रुग्णालयांमधील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
-नियोजित शस्त्रक्रियाच्या रुग्णांना पाठविले घरीमेयो, मेडिकलमध्ये नेत्ररोग, ईएनटी, सर्जरी, ऑर्थापेडिक व गायनिक विभागाची मिळून रोज २००वर नियोजित शस्त्रक्रिया होतात. परंतु संपामुळे गुरुवारी यातील जवळपास १५० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेसाठी जे रुग्ण भरती होते त्यांना बुधवारीच घरी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.