लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागात उपचारासाठी आलेल्या एक ६५ वर्षीय रुग्णाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. रुग्णाने आजाराला कंटाळून स्वत:हून उडी मारली की, तोल जाऊन खाली पडले याचा तपास अजनी पोलीस करीत आहेत.
तुळशीराम बांगडे रा. हनुमाननगर असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बांगडे हे मागील काही महिन्यांपासून मुत्राशयाच्या आजारावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात उपचारासाठी येत होते. शुक्रवारी ते उपचारासाठी आले असताना त्यांना दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘सिस्टोस्कोपी’ करण्यासाठी बोलविण्यात आले. बांगडे शनिवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता रुग्णालयात आले. त्यांच्यासोबत कोणीच नव्हते. ९.२० वाजेच्या सुमारास वरून खाली पडण्याचा अचानक मोठा आवाज झाला. डॉक्टरांसह सर्वच जण त्या दिशेने धावले. रुग्णालयाच्या मधल्या भागात बांगडे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. लागलीच बधिरीकरण विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाला वॉर्ड क्र.४ मध्ये नेऊन जीव वाचविण्यासाठी प्राथमिक उपचार केले. रुग्णाचे दोन्ही हातपाय व छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या. डोक्यालाही गंभीर जखम झाली होती. तेथून लागलीच मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व अजनी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी रुग्णाच्या मोबाइलवरून घरच्यांशी संपर्क साधून त्यांना बोलावले. त्यांच्या मते, लहान मुलगा त्यांना रुग्णालयात सोडून निघून गेला होता. हा रुग्ण दुसऱ्या मजल्यावरून की चवथ्या मजल्यावरून खाली पडला याची कुणालाच माहिती नाही. अजनी पोलीस या घटनेला घेऊन तपास करीत आहे; परंतु पहिल्यांदाच झालेल्या या घटनेने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रॅम्पवर बसणे धोकादायकच
चार मजल्याच्या या रुग्णालयात लिफ्ट सोबतच ‘रॅम्प’चीही व्यवस्था आहे. वीज नसल्यास रुग्णाला रॅम्पवरून वॉर्डात नेले जाते. या रॅम्पच्या भिंती छोट्या आहेत. अनेक जण त्यावर बसतात तर काही चक्क झोपतात. अशावेळी तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे येथील सुरक्षा रक्षकांसोबतच डॉक्टरही रॅम्पच्या भिंतीवर बसणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मनाई करतात.