लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध चाचण्यांच्या अहवालावरून अखेर १५ वर्षीय युवकाला ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ या दुर्मीळ आजाराचे निदान झाले. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णानेही उपचाराला प्रतिसाद दिला. यामुळे तब्बल १०७ दिवसांनी रुग्ण व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. ही घटना खासगी रुग्णालयातील नव्हे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आहे. मृत्यूच्या दाढेतून मुलाला बाहेर काढल्याने मुलाच्या आईने सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
गडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सुनीलला (बदलेले नाव) मिरगीचा आजार आहे. लहानपणीच पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्यासह दोन मुलांची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली.
खासगी काम करून ती घर चालवायची. २४ जुलै २०२१ रोजी अचानक सुनीलची प्रकृती खालावली. त्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचा ताप वाढण्यासोबतच संपूर्ण अंगावर व आंतर अवयवांवरही फोड आले. यामुळे डॉक्टरांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात भरती केले. उपचाराला सुरुवात झाली. तपासणीतून त्याला ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. त्याला श्वासही घेता येत नव्हता. यामुळे त्यााल त्वरित व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याने अँटिबायोटिक औषधांनाही तो प्रतिसाद देत नव्हता. परिणामी डॉक्टरांनी मल्टिपल अँटिबायोटिक देणे सुरू केले. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. १०७ दिवसांनंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले. नुकतेच त्याला सामान्य वॉर्डात हलविण्यात आले आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी मिळणार आहे.
आजाराची गुंतागुंत वाढली होतीसुनीलचा आजार इतका पसरला होता की, त्याला श्वास घेणेही कठीण झाले होते. फुप्फुसावर सूज येऊन त्यामध्ये रक्तातील पाणी जमा होऊ लागले होते. त्याचा रक्तदाब कमी होण्यासोबतच किडनीवर त्याचा प्रभाव पडला होता. मेंदूच्या नसांमध्येही रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. गुंतागुंत वाढली होती. व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नामुळे त्याची प्रकृती स्थिर झाली. -डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख आयसीयू, मेडिसिन विभाग, मेडिकल